Saturday, April 11, 2009

विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर समझोता नाही - उद्धव


केंद्रीय कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांनी इतका भिकार कारभार केला असताना त्यांना पंतप्रधानपदाकरिता पाठिंबा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर समझोता करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीकरिता शिवसेनेचा ‘वचननामा’ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार या केवळ वावडय़ा असून त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. शरद पवार यांच्या कारभाराबद्दल जनतेत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाकरिता त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्न येत नाही. शिवसेनेने राष्ट्रपतीपदाकरिता प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला. परंतु त्यापूर्वी शिवराज पाटील यांचे नाव काँग्रेसकडून पुढे आले तेव्हा त्याला विरोध केला. शिवराज हेही मराठीच होते. म्हणजे केवळ मराठी हा पाठिंबा देण्याचा निकष नव्हता व आताही असू शकत नाही. जनतेचे व विशेष करून महाराष्ट्राचे प्रश्न सोडविणाऱ्या व्यक्तीला शिवसेना प्राधान्य देईल. राज ठाकरे यांच्या मनसेबद्दल विचारले असता एवढय़ा मोठय़ा कार्यक्रमात एवढे छोटे प्रश्न विचारू नका, असे उद्धव उद्गारले. राज यांना बाळासाहेबांनी उत्तर दिले आहे, असे उद्धव म्हणाले. मात्र त्याउपरही राज ठाकरे कुणाची मते खाणार, असे विचारले असता ठाकरे म्हणाले की, शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या मतदारांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ऋणानुबंध आहे. गेल्या ४२ वर्षांत अनेकांनी शिवसेनेला मतपेटीतून धक्का देण्याचा प्रयत्न केला. परंतु कुणालाही ते जमले नाही. कुर्ला येथील महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात ‘इधरसे-उधरसे’ हेही होते. परंतु ९०० मतांनी ती जागा शिवसेनेने जिंकली. मनसेचा लोकसभा निवडणुकीत फारसा प्रभाव राहणार नाही व शिवसेनेच्या उमेदवारांना त्यांच्यापासून धोका पोहोचणार नाही, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात हिंदुत्व, राम मंदिर, आर्थिक प्रश्न याला थारा दिला नसल्याकडे ठाकरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, शिवसेना हिंदुत्व सोडणे अशक्य आहे. हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे. राम मंदिर बांधले गेले तर शिवसेनेचा त्याला संपूर्ण पाठिंबा आहे. मात्र तो भाजपच्या जाहिरनाम्यातील मुद्दा आहे. आर्थिक प्रश्नांची जाण असलेल्या मनमोहन सिंग यांनी देशाची काय वाट लावली ते तर दिसतच आहे.

No comments:

Post a Comment