Saturday, April 11, 2009

विजयी धोनी ब्रिगेडचे ग्रॅंड वेलकम


न्यूझीलंडच्याच भूमीत किवींना चारीमुंड्या चीत करुन इतिहास रचणारी धोनी ब्रिगेड गुरुवारी सकाळी मायदेशी परतली. धोनीचे धुरंधर भारतात पोहचताच वेगवेगळ्या मार्गाने स्वगृहाकडे रवाना झाले. परंतु प्रत्येक ठिकाणी टीम इंडियाच्या या स्टार्स खेळाडूंचे "ग्रॅंड वेलकम' करण्यात आले.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसमवेत पाच भारतीय खेळाडूंचे गुरुवारी सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झाले. एकदिवसीय व कसोटी सामन्यात भारताच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरलेले तेंडुलकर, झहीर खान, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी, मुनाफ पटेल येथून आपल्या स्वगृही परतले. अत्यंत लांबच्या व कंटाळवाण्या प्रवासामुळे खेळाडू थकल्यासारखे दिसत होते. परंतु न्यूझीलंडमध्ये घडवलेल्या पराक्रमाची चमक त्यांच्या डोळ्यात स्पष्ट जाणवत होती."कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी आणि देशाच्या उत्तर भागामध्ये राहणारे खेळाडू दुसऱ्या एका विमानाने थेट दिल्लीला रवाना झाले. तसेच राहुल द्रविड, व्ही. व्ही.एस. लक्ष्मण आणि दिनेश कार्तिकसारख्या दक्षिण भारतात राहणाऱ्या काही खेळाडूंनी येथून आपल्या शहरासाठी फ्लाईट पकडली. कर्णधार धोनी समवेत न्यूझीलंड दौऱ्यावरील ऐतिहासिक विजयाचा नायक ठरलेला दिल्लीकर सलामी फलंदाज गौतम गंभीर, धडाकेबाज सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग, टीम इंडियाचा स्पिडस्टर ईशांत शर्मा, ऑफ स्पिनर अमित मिश्रा हे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले, तेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट-प्रेमींनी एकच गर्दी केली होती. या ऐतिहासिक दौऱ्यानंतर खेळाडूंची पहिली प्रतिक्रिया मिळवण्यासाठी पत्रकारांचीही झुंबड उडाली. परंतु त्यांच्या हाती निराशाच लागली. हे सर्व खेळाडू पत्रकारांशी संवाद न साधताच आपल्या सुरक्षारक्षकांच्या साथीने निघून गेले.यावेळी वीरेंद्र सेहवागसमवेत त्याची पत्नी आरती होती तर ईशांतचे वडील विजय शर्मा हे परदेशात भारताचा झेंडा उंचावणाऱ्या आपल्या लाडक्‍या मुलाला घ्यायला विमानतळावर आले होते.मंगळवारी वेलिंग्टन येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने भारतीय संघाला विजयाची हुलकावणी दिल्यानंतर भारताने ही मालिका 1-0 ने आपल्या नावे करुन इतिहास घडवला. तत्पूर्वी भारताने हॅमिल्टन कसोटीत 10 विकेटनी शानदार विजय साकारला तर नेपियर कसोटी अनिर्णीत राहिली. गेल्या 41 वर्षात न्यूझीलंडच्या भूमीत भारताचा हा पहिला कसोटी विजय ठरला.यापूर्वी 1967-68 मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्या संघाने हा कारनामा करुन दाखवला होता. तत्पूर्वी भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने बाजी मारली आणि न्यूझीलंडच्या भूमीतील भारताचा पहिला एकदिवसीय मालिका विजय आहे.

No comments:

Post a Comment