Saturday, April 11, 2009

युती-आघाडीवाले भंपक

युती आणि आघाडीवाले दोघेही भंपक असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्य सरकारने आजवर केलेला अन्याय लक्षात ठेवून मतदानाला उतरा, आणि त्यांना धडा शिकवा, असे आवाहन नागरिकांना केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ईशान्य मुंबईतील उमेदवार शिशिर शिंदे यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांनी भांडूप येथे सभा घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मराठी माणसाचा मुद्दाही त्यांनी पुन्हा एकदा लावून धरला. देशातील राज्यकर्त्यांच्या कुचकामी धोरणांमुळे आतापर्यंत तीन पिढ्या वाया गेल्या आहेत, असे सांगून शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची छूपी युती असल्याचा पुर्नआरोप त्यांनी केला. भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्याचाही ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. भाजप केंद्रात साडेचार वर्षे सत्तेत होते. त्यावेळी का राम मंदिर बांधले नाही. इतके दिवस काय मुहुर्त शोधत होते काय,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नवनवीन आश्‍वासने द्यायची आणि लोकांची माथी भडकावयाची हेच काम भाजपने केले. अफझल गुरुला 2001 ते 2004 या काळात फाशी का दिली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठी माणसाबद्दलचे आंदोलन कायम सुरु ठेवणार असल्याचे सांगून ते म्हणाले, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय आपण कोणाच्या हाताखाली काम करु शकणार नाही. अभिताभ आणि जया बच्चन यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खासदार निवडून गेले, तर संसदेमध्ये मराठी माणसाचा अपमान करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment