Saturday, April 11, 2009

लातूरचे ज्येष्ठ विधिज्ञ बळवंतराव पांडे यांचे निधन

लातुरातील ज्येष्ठ विधिज्ञ बळवंतराव पांडे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. दिवंगत बळवंतराव पांडे यांनी १९७० पर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात न्यायधीश म्हणून काम केले त्या नंतर नोकरीचा राजीनामा देऊन त्यानी लातुरात वकिली सुरू केली. १९७८ साली स्थापन झालेल्या जनता पक्षाचे त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले होते. सातूर वकील मंडळ, श्री केशवराज मंदिर देवस्थानचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अॅड संजय, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
----------------------------------
मुंडेंचा जयसिंगरावांशी पुन्हा 'दोस्ताना'
राजकारणात कधीही कुणीही कायमचा मित्र वा शत्रू असू शकत नाही... याच उक्तीचा परिचय बीडमध्ये पुन्हा एकदा आला. कधीकाळी एकमेकांचे लंगोटी यार असलेले गोपीनाथ मुंडे व जयसिंगराव गायकवाड एकमेकांचे कट्टर हाडवैरी बनले आणि शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भेटीनंतर पुन्हा एकदा त्यांचा ‘ दोस्ताना ’ जुळून आला. बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत असलेले गोपीनाथ मुंडे यांनी तेथील विद्यमान खासदार जयसिंगराव गायकवाड यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. भेटीसाठी त्यांनी वेळ निवडली ती मध्यरात्री पावणे दोन वाजताची... जयसिंगराव गायकवाड गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेवर निवडून गेले होते. परंतु यावेळी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर जयसिंगरावांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जयसिंगराव गायकवाड हे कधीकाळी भाजपमध्ये होते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि जयसिंगराव गायकवाड यांचा दोस्ताना सर्वपरिचित होता. परंतु ११ वर्षांपूर्वी जयसिंगरावांचे महाजन-मुंडेंशी पटेनासे झाले. त्यामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरला. या काळात जयसिंगराव आणि महाजन-मुंडे यांच्यातून विस्तवही जात नव्हता. परंतु जयसिंगराव शिवसेनेत आल्यानंतर मुंडे आणि त्यांच्यातील मतभेद आता पुन्हा संपुष्टात आले आहेत. मध्यरात्री झालेल्या भेटीनंतर या दोन मित्रांमधील सर्व मतभेद मिटल्याचे दोघांनीही सांगितले. मध्यंतरीच्या काळात आमच्यात मतभेद निर्माण झाले होते. परंतु आता माझा मित्र मला पुन्हा सापडला आहे, अशी प्रतिक्रिया गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केली. तर आमची दोस्ती म्हणजे फेविकोल का मजबूत जोड आहे, अशी कोपरखळी जयसिंगराव गायकवाड यांनी मारली. बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या प्रचारासाठी जयसिंगराव आता हिरीरीने पुढाकार घेणार आहेत

No comments:

Post a Comment